शिरवळ – भोळी, ता. खंडाळा येथे घराच्या उघड्या खिडकीत ठेवलेल्या बॅगेतून चोरट्यांनी मंगळसूत्र, रोख रक्कम, एटीएम कार्डसह दोन लाख चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याने गावात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोळी, ता. खंडाळा येथील यात्रा गुरुवारी (दि. 30 मार्च) झाली. या यात्रेकरिता खंडाळा येथील शालिनी अंकुश चव्हाण (वय 69) ह्या पतीसमवेत पुतण्याकडे आल्या होत्या. त्यावेळी देवाचे दर्शन घेऊन शालिनी चव्हाण ह्या भोळी येथे घरी परत आल्या. त्यांनी गळ्यातील सोन्याचे दोन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून त पुतणीकडे ठेवायला दिले होते.
पुतणीने मंगळसूत्र छोट्या पाकिटात घालून कपड्याच्या बॅगेत ठेवले. ही बॅग तिने उघड्या खिडकीत ठेवली होती. घरातील लोक रात्री झोपी गेले. शालिनी चव्हाण या शुक्रवारी खंडाळ्याला परत जायला निघाल्या. मंगळसूत्र घेण्यासाठी त्यांनी व पुतणीने खिडकीतील बॅग पाहिली असता, बॅगेची चेन उघडी दिसली. त्यांनी बॅग उघडून पाहिल्यावर मंगळसूत्र, साडेचार हजार रुपये रोख, पुतणीचे एटीएम कार्ड असा ऐवज चोरीला गेल्याचे आढळले. याबाबत शालिनी चव्हाण यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार संजय सकपाळ तपास करत आहेत.