कोरेगाव, (प्रतिनिधी) – कोरेगाव-कुमठे-भाडळे रस्त्यावर कुमठे गावानजीक काल (दि. 9) रात्री 8.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील आप्पालाल चव्हाण आणि महादेव गौडा हे विजापूर जिल्ह्यातील रहिवासी जागीच ठार झाले. हे दोघे भोसे, ता. कोरेगाव येथे विहिरीच्या कामावर मजूर म्हणून काम करत होते. या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत माहिती अशी, आप्पालाल चव्हाण व महादेव गौडा हे भोसे येथे गेले दोन-तीन महिने विहिरीच्या कामावर मजूर म्हणून काम करत होते. शनिवारी आणि रविवारी द्वैत अमावास्या असल्याने पूजेचे साहित्य आणायला ते दोघे शनिवारी (दि. 9) सायंकाळी 6.30 च्या सुमारास हिरो स्प्लेंडर मोटारसायकलवरून कोरेगावला गेले होते. साहित्य खरेदी करून. ते भोसेकडे परत निघाले होते. त्यावेळी कुमठे गावानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
या अपघाताची माहिती कुमठे ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी पोलिसांना माहिती दिली. त्याचबरोबर रुग्णवाहिका बोलावून घेतली. दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी आनंदा चव्हाण यांनी तक्रार दिली असून, हवालदार विक्रांत लावंड तपास करत आहेत.