महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात धनिकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर रविवारी कारवाई करण्यात आली. मेटगुताड येथील संबाला हॉटेल आणि आणखी एक बांधकाम पहाटे बुलडोजरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. गुरेघर येथे कड्यावर नव्याने सुरू करण्यात आलेले पाच हजार स्क्वेअर फुटांचे अनधिकृत बांधकामदेखील पाडण्यात आले.
महाबळेश्वरमध्ये ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर असल्याने बिगरशेती बांधकामांसाठी जिल्हाधिकार्यांची परवानगी अनिवार्य आहे; परंतु गेल्या काही वर्षांत तालुक्यात अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्यानुसार रविवारी पहाटे 5 वाजल्यापासून कारवाई सुरू करण्यात आली.
मेटगुताड येथे श्रीमती मनीषा राजेश पाटील आणि द्वारकादास गंगाधरदास पंचमत्तिया यांनी केलेल्या दोन अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने हातोडा मारला. गुरेघर येथे श्रीमती प्राची दिनेश नागपूरवाल यांनी केलेले पाच हजार स्क्वेअर फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत करण्यात आली.
या कारवाईबाबत महसूल विभागाकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. रविवारी पहाटेच जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टरच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी खोचरे-पाटील, वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, पाचगणीचे मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे, महाबळेश्वरच्या मंडलाधिकारी खटावकर, तलाठी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
महाबळेश्वर व पाचगणी पोलीस ठाण्यांच्या अधिकार्यांनी मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. या कारवाईचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले असून, महाबळेश्वर शहर परिसर आणि तालुक्यात फोफावलेल्या इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.