टेग्युसेगाल्पा – ईटा वादळ कॅरेबियातील निकारगुआच्या किनारपट्टीवर मंगळवारी धडकले. त्यानंतर या वादळाने होंडुरासमध्ये मोठी हानी केली. त्यानंतरही या वादळाचा परिणाम या परिसरामध्ये जाणवतो आहे. अजूनही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे.
वादळ आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये किमान दोघेजण ठार झाले आहेत. तर हजारो जण विस्थापित झाले आहेत. वादळाच्या तीव्रतेने होंडुरासच्या सरकारने बुधवारी देशव्यापी आणीबाणीची घोषणा केली. या वादळाची तीव्रता पाहता “रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे, असे होंडुरासचे अध्यक्ष जुआन ओरलॅन्डो हेरनांदेझ यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे आलेल्या पूराने किमान 5 पूलांचे नुकसान झाले आहे. तर 41 वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. टेग्युसेगाल्पाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेमुदत काळासाठी बंद करावा लागला आहे. ईटा वादळामुळे देशाच्या ईशान्येकडील किमान 30 हजार नागरिकांना सुरक्षिततेसाठी आश्रय छावण्यांमध्ये विस्थापित व्हावे लागले आहे.
या वादळामुळे शेजारील अल सल्वादोरमध्येही एकाचा मृत्यू झाला आहे. तर मासेमारीशी संबंधित सर्व उद्योग बेमुदत काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
कोस्टा रिकामध्ये 773 जणांना आश्रय छावण्यात स्थलांतरित व्हावे लागले आहे. देशातील पायाभूत सुविधांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरडी कोसळण्याच्या 69 घटना घडल्या असून या दरडी महामार्गांवर पडल्या असून वाहतुक खंडीत झाली आहे.