नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा जवानांना मोठे यश मिळाले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना जवानांकडून ठार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील एक दहशतवादी पाकिस्तानचा होता. तर दुसऱ्याचे नाव आमीर सिराज असून तो कॉलेज विद्यार्थी आणि फुटबॉलर होता. दोघांचेही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. आमीर 2 जुलै 2020 पासून बेपत्ता होता.
सोपोर येथील पोलीस अधिकाऱ्याने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार, आमीर सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झला होता. आमीर फुटबॉल खेळण्यासाठी सोपोर येथील मामाच्या घऱातून बाहेर पडला तेव्हापासून बेपत्ता आहे. तो पुन्हा घरी परतलाच नाही. नंतर तो जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती मिळाली. आमीरचा दहशतवादाशी काहीही संबंध नव्हता. पण तो सोपोरमधील ज्या परिसरात राहत होता तिथे अनेकांनी दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला आहे.बारामुल्ला येथे काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, 29RR आणि 176Bn सीआरपीएफकडून संयुक्त मोहीम राबवण्यात आली. दहशतवादी घरात लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि चकमकीला सुरुवात झाली.
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दोन्हीही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित होते. दोघेही अनेक दहशतवादी घटनांमधअये सहभागी होते.घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
2020 मध्ये सुरक्षा जवानांनी दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या अनेक स्थानिकांना पुन्हा घरी आणण्यात यश मिळवले आहे. आमीरलाही ती संधी देण्यात आली, पण त्याने नकार दिला. 2017 मध्ये अशाच पद्धतीने जिल्हास्तरीय खेळाडू माजीद खान दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. पण त्याने सुरक्षा जवानांसमोर आत्मसमर्पण करत पुन्हा एकदा सामान्य जीवन स्वीकारले होते.