कोथरूड येथील कार्यक्रमात आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
कोथरूड – प्रभागामध्ये विकासकामे करत असताना, नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचे काम करावे. त्यातून नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांची आपुलकीची नाळ जोडली जाते, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
करोना महामारीत उल्लेखनीय कामगीरी करणारे डॉक्टर, पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, आरोग्यसेवक यांना “करोना योद्धा अटल सन्मान’ देऊन भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती सप्ताह निमित्त गौरविण्यात आले.
त्याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांचा चार वर्षांतील विकासकामांचा कार्य अहवाल प्रदेशाध्यक्ष पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. नगरसेवक सुशिल मेंगडे, कोथरूड अध्यक्ष पुनित जोशी, सचिन मोरे, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, श्रद्धा प्रभुणे, हर्षाली माथवड, वासंती जाधव यावेळी उपस्थित होते.
खासदार बापट यांनी दिनदर्शिकेच्या स्वरूपातील कार्यअहवालाच्या संकल्पनेचे कौतुक करत गणेश आणि अल्पना हे दोघे सुरुवातीपासून पक्षाच्या बरोबर आहेत. पक्षवाढीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रदेश चिटणीस ऍड. गणेश वरपे यांनी केले होते. सूत्रसंचालन स्वीकृत सभासद वैभव मुरकुटे तर आभार सागर कडू यांनी मानले.
दिनदर्शिकेच्या माध्यमातून चार वर्षांतील कामाचा लेखाजोखा नागरिकांपुढे सादर करताना आनंद होत आहे. प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून, विकासकामे मार्गी लागल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधानाची भावना हीच आमच्या पाठीवर शाब्बासकीची थाप आहे.
– अल्पना वरपे, नगरसेविका