पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डाने पुढील दोन दिवस पूर्णत: लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत बोर्डाच्या हद्दीतील केवळ औषधांची दुकाने खुली राहणार असल्याचे बोर्डाचे कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले.
कॅटोंन्मेंट हद्दीतील घोरपडी, मोदीखाना, फामिमानगर, सोलापूर बाजार, दस्तूर मेहर रस्ता आणि भीमपुरा या ठिकाणी करोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आढावा घेण्यासाठी बोर्डाकडून 8 मे रोजी विशेष बैठक घेण्यात आली. करोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी दि.9 आणि 10 मे रोजी पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या सक्तीच्या लॉकडाऊनचे पालन करण्याच्या सूचना नागरिकांना बोर्डाने दिल्या आहेत.
दरम्यान, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयाने “डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात आतापर्यत 3 हजार घरांमधील सुमारे 13 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी पाच ऍब्युलन्स तैनात केल्या आहेत. प्रत्येक ऍब्युलन्समध्ये डॉक्टर, दोन परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.