Share Market 18 May 2024: शनिवारी (18 मे) रोजी BSE आणि NSE वर इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये दोन भागांत एक विशेष लाईव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2,14,906 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 17 मे रोजी बाजार बंद झाल्यानंतर BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 4,10,24,081.08 कोटी रुपये होते. 18 मे रोजी विशेष सत्रांतर्गत दुसऱ्या सत्राच्या शेवटी बाजार बंद झाल्यानंतर, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 214906 कोटी रुपयांनी वाढून 4,12,38,987.85 कोटी रुपयांवर पोहोचले.
18 मे रोजी, BSE आणि NSE वर पहिले विशेष लाईव्ह ट्रेडिंग सत्र सकाळी 9.15 ते 10.00 या वेळेत प्रायमरी साइटवर आयोजित करण्यात आले होते. दुसरे विशेष सत्र सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत डिजास्टर रिकव्हरी साईटवर आयोजित करण्यात आले होते.
पहिले सत्र संपले तेव्हा शेअर बाजार कसा होता?
सकाळच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला विदेशी भांडवलाच्या नव्या गुंतवणुकीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढ नोंदवली. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 158.01 अंकांनी वाढून 74,075.04 वर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निर्देशांक निफ्टी देखील 53.75 अंकांनी वाढून 22,519.85 वर पोहोचला. या सत्राच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 42.60 अंकांच्या किंवा 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 73,959.63 वर पोहोचला. निफ्टी देखील 15.80 अंक किंवा 0.07 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 22,481.90 वर राहिला.
दुसऱ्या सत्राची स्थिती –
यानंतर सकाळी 11.30 वाजता सुरू झालेल्या दुसऱ्या विशेष सत्राच्या सुरुवातीला बाजारात तेजी कायम राहिली आणि बीएसई सेन्सेक्स 68.17 अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 28.20 अंकांनी वधारला. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 88.91 अंकांनी किंवा 0.12 टक्क्यांनी वाढून 74,005.94 वर बंद झाला. सत्रादरम्यान तो 245.73 अंकांनी किंवा 0.33 टक्क्यांनी वाढून 74,162.76 वर पोहोचला. निफ्टी 35.90 अंकांनी किंवा 0.16 टक्क्यांनी वाढून 22,502 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये नेस्ले, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी मोठी वाढ दर्शविली. दुसरीकडे जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती आणि कोटक महिंद्रा बँक लाल रंगात बंद झाले. अमेरिकेतील बहुतांश शेअर बाजार शुक्रवारी वाढीसह बंद झाले होते.
नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि हिंदाल्को हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एलटीआय माइंडट्री आणि मारुती हे सर्वाधिक घसरले.
देशांतर्गत शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी वाढ –
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी वधारला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) अनेक दिवस सतत पैसे काढल्यानंतर शुक्रवारी खरेदीदार बनले होते. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 1,616.79 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. शुक्रवारी BSE सेन्सेक्स 253.31 अंकांनी वाढून 73,917.03 वर बंद झाला आणि NSE निफ्टी 62.25 अंकांनी वाढून 22,466.10 वर बंद झाला होता.