मुंबई – वरळी लिफ्ट दुर्घटना प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा नोंदवित त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मुंबईतील वरळी भागात निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून शनिवारी पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
वरळीतील हनुमान गल्लीत बीडीडी चाळ नंबर 118, 119 च्या समोर असलेल्या ललित अंबिका या निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले होते.
या प्रकरणी एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा नोंदवून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटकेतील आरोपींनी कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट यासारख्या सुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी घडली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य केले होते. जखमींना तातडीने केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.