श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील हंदवारा इथे दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत 5 सुरक्षा जवानांना आज वीरमरण आले. 21 राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह मेजर अनुज सूद, नाईक राजेश कुमार आणि लान्स नाईक दिनेश यांना आज वीरमरण आले. त्यांच्याव्यतिरिक्त जम्मू काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी यांनाही वीरमरण आले.
श्रीनगरपासून 70 किलोमीटर अंतरावरील हंदवारा भागात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते. हंदवारामधील चंगीमला भागात दहशतवाद्यांनी नागरिकांना ताब्यात घेत असल्याचे गुप्तचरांच्या माध्यमातून समजले होते. त्या नागरिकांना सोडवण्यासाठी जम्मू काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी शनिवारी रात्री संयुक्तपणे कारवाईला सुरुवात केली होती. जवान आणि पोलीसांचे 5 जणांचे पथक या भागामध्ये घुसले होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत ही चकमक सुरूच होती. दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईमध्ये एक पोलीस अधिकारी आणि अन्य दोन जवानही सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान दोन दहशतवादी मारले गेले आणि काही नागरिकांची सुटका करण्यास सुरक्षा दलांना यशही आले होते.
मात्र दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला आणि या चकमकीदरम्यान कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, जम्मू काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी यांच्यासह दोन जवानांना वीरमरण आले, असे जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले. शहिद झालेले कर्नल आशुतोष शर्मा यांना शौर्य पदकाने दोन वेळा सन्मानित करण्यात आले होते. गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा त्यांना शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते.