आळंदी, (वार्ताहर) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली. यावेळी माऊली मंदिरातील विणा मंडपात अविनाश महाराज गरड यांची कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली.
कीर्तनसेवेस साथ संगत श्रीकृष्ण महाराज कोलते, बालाजी महाराज मोहिते, उदय महाराज चोरगे, अशोक महाराज सालपे, पुथ्वीराज महाराज कराळे यांच्यासह श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील साधक विद्यार्थ्यांनी दिली.
याप्रसंगी माऊलींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, माऊली महाराज सावर्डेकर, आळंदीधाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण आदींसह भाविक, श्रोते उपस्थित होते. गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त कीर्तन सेवा संपताच पुष्पवृष्टी, हरिनामाचा गजर जयघोष भाविकांनी केला. श्रींचे दर्शन, महाप्रसाद वाटप भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कीर्तन सेवेस सुरुवात करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या गुनीजन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उपस्थितीमध्ये कीर्तनाला सुरुवात झाली.
ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये कार्यक्रमासाठी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवे यांचे प्रयत्नातून उपक्रम राबविण्यात आला. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कमिटी यांच्या वतीने कीर्तनकार यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.