मंचर- मंचर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेला सराईत गुन्हेगार आणि पोलिसांवर हल्ला करून पोलिसांना चकवा देऊन फरार झालेला राजेंद्र ऊर्फ तुकाराम बन्सी वारे (वय 19, रा. पळशी, ता. पारनेर, आणि उत्तम दादाभाऊ दुधवडे (वय 25, रा. वाळूचा दरा, शेरी चिखलठाण, ता. राहुरी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आळेफाटा (ता. जुन्नर) येथून शुक्रवारी (दि. 28) रात्री ताब्यात घेतले.
अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस कर्मचारी एस.व्ही. जम, एस. ए. जावळे, शरद बांबळे, डी. डी. साबळे, अक्षय नवले आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. दोन्ही आरोपींवर पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोख रक्कम असे एकूण 2 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, तसेच सत्यनारायण पडवळ, नवनाथ पडवळ, विष्णु ताजणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. आशिष पडवळ यांनी चोरीबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम आणि चिल्लर एकूण नऊ हजार रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी ज्ञानेश्वर सीताराम वाव्हाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली होती. आरोपी राजेंद्र ऊर्फ तुकाराम बन्सी वारे याने पोलिसांना चकवा देऊन फरार झाला. उत्तम दादाभाऊ दुधवडे हा आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होता. या दोघांनाही आळेफाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेशण पथकाने पकडले.