मांडवगण फराटा – शेतात राब राब राबून कोबी, फ्लॉवर पिकावला, पण बाजारामध्ये भाजीपाल्याला योग्य भाव न मिळाल्याने शिरूरच्या पूर्व भागातील वडगाव रासाई येथील बंडातात्या म्हस्कू शेलार याने तीन एकर जमिनीत उभ्या असलेल्या कोबी, फ्लॉवरच्या पिकात रोटर चालून पीक नष्ट करून टाकले. या शेतकऱ्यांच्या हतबलतेकडे महाविकास आघाडी सरकार लक्ष देणार? हा खरा यक्षप्रश्न आहे.
शेलार यांनी फ्लॉवर पिकावरील रोगराई नियंत्रणात आणण्यासाठी महागडी औषधे फवारली. या फ्लॉवर पिकासाठी एकूण दोन लाख रुपयांच्या आसपास त्यांनी खर्च केला. फ्लॉवर पिकाचे उत्पन्न चांगले मिळविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन फ्लॉवर पीक चांगले जोमात आणले. मात्र, फ्लॉवर मार्केटमध्ये पाठविण्यास आल्यानंतर या पिकाचा बाजारभाव ढासळला.
सध्या फ्लॉवर काढण्याची मजुरीदेखील मिळत असलेल्या बाजारभावातून निघत नाही. त्यामुळे मजुरांना मजुरी देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी कोणतेही सरकार आले तरी कायमच निराशा ठरली असल्याचे शेलार यांनी सांगितले. तालुक्यातील मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव, सादलगाव आदी भागांत कोबी, फ्लॉवर यासह अन्य भाजीपाल्याचे उत्पादन शेतकरी घेतात. यंदाही कोबी, फ्लॉवरची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे; मात्र त्याला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
- माझा तीन एकर कोबी, फ्लॉवर आहे. मागील महिनाभरापासून बाजारभावात सुधारणा झाली नाही. चार महिन्यांपूर्वी 22 ते 23 रुपये कि लो बाजारभाव मिळाला होता. सध्या किलोला 1 ते 3 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आज तीन एकर क्षेत्रावर रोटर फिरवण्याची वेळ आली आहे.
– बंडातात्या शेलार, शेतकरी, वडगाव रासाई