पुणे – शहरात मंगळवारीही करोना बाधितांपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. दिवसभरात 185 बाधित सापडले, तर 357 जण करोनामुक्त झाले आहेत. मागील आठ दिवसांत शहरातील करोना मृत्यूने घातलेला कहर ओसरला असून, गेल्या 24 तासांत करोनामुळे केवळ 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील करोनाचा प्रादुर्भाव डोकेदुखी ठरला. मात्र, ऑक्टोबरमध्ये प्रादुर्भाव आटोक्यात येऊ लागल्यामुळे प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला. आता नोव्हेंबरमध्येही हा आटोक्यात राहावा, प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, सणामुळे होणारी गर्दी आणि तज्ज्ञांकडून करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे अजूनही संकट गेले नाही.
बाधितांची संख्या कमी झाली असली तरी, दररोजच्या बाधितांमुळे शहरातील एकूण बाधित संख्या 1 लाख 63 हजार 619 वर जाऊन पोहचली आहे. त्यातील 1 लाख 54 हजार 485 बाधित सुखरूप घरी गेले, तर 4 हजार 352 बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, शहरात आज (दि.10) दिवसभरात 2,229 जणांची नमुने तपासणी करण्यात आली.
तर 4,782 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 378 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 239 बाधित व्हेंटिलेटर तर 139 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.