लोणी काळभोर – महाराष्ट्रात गेल्या अनेक शतकांपासून बारा बलुतेदार व्यावसायिक छोटे, छोटे व्यवसाय करून पोट भरत आहेत. यामध्ये कुंभार, कोळी, गुरव, चांभार, मातंग, तेली, नाभिक, परीट, माळी, महार, सुतार व लोहार या बांधवांचा बारा बलुतेदारांमध्ये समावेश होतो. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या या सर्वच समाज बांधवावर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या समाजबांधवांपैकी नाभिक समाजाला गेल्या दीड महिन्यांत आपला घरखर्च भागवणे अतिशय मुश्किल झाले आहे.
दुकानाचे भाडे भरायचे कसे?
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीत एकूण 72 केशकर्तनालये आहेत. त्यातील 45 स्थानिक नाभिक बांधवांची असून, उर्वरित परराज्यातील म्हणजे उत्तर प्रदेश व बिहारमधील लोकांची आहेत. सर्वच 72 नाभिक बांधवांचे हातावर पोट आहे. बहुतेक सर्वांची दुकाने भाड्याच्या जागेत आहेत. सर्व दुकानांना प्रत्येक महिन्याला कमीत कमी 5 हजार रुपये भाडे असते. दुकान जरी बंद असले तरी महिना भरला की भाडे द्यावेच लागते. सर्वच नाभिक बांधव भाड्याच्या घरात राहत आहेत.
उसने पैसेही देईनात
लॉकडाऊन उठत नाही. करोना संपत नाही, तोपर्यंत नाभिक बांधवांची घसरलेली आर्थिक घडी लवकर बसणार नाही, हे वास्तव आहे. नाभिक व्यवसायात दररोज थोडा थोडा पैसा येत असतो. येणाऱ्या पैशाचे प्रमाण साधारण असते. त्यामुळे इच्छा असूनही गुंतवणूक करू शकत नाहीत. त्यामुळे सध्या शिलकीत बिलकूल पैसे नाहीत, जे होते ते दीड महिन्यात संपून गेले आहेत. दुकान बंद असल्याने कुणी उसने पैसेही देत नाही.