अंकारा – स्वीडनला नाटोचे सदस्य करून घेण्यासाठी तुर्कीयेच्या संसदीय समितीने काल मंजूरी दिली. यामुळे आता नाटोमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने स्वीडनचे एक पाऊल पुढे पडले आहे.
स्वीडनच्या नाटो प्रवेशाला तुर्कीयेने यापूर्वी विरोध केला होता. आता हा विरोध मावळला आहे. आता स्वीडनला नाटोचे सदस्य देण्याचा ठराव तुर्कीयेच्या संसदेमध्ये मंजूर होणे गरजेचे आहे. मात्र तुर्कीयेच्या संसदेतील ठराव कधी होईल, हे मात्र अद्याप निश्चित नाही.
कुर्दिश बंडखोर आणि २०१६ मध्ये तुर्कीयेतील फसलेल्या बंडामागील गटाला स्वीडनमध्ये आश्रय दिला जात असल्याच्या आरोप तुर्कीयेने केला होता. यावरूनच स्वीडनच्या नाटो प्रवेशाला तुर्कीयेने गेल्या वर्षभरापासून आडकाठी घातली होती.
स्वीडनच्या नाटो सहभागाला तुर्कीये बरोबर हंगेरीनेही आक्षेप घेतला आहे. हंगेरीकडून स्वीडनच्या सहभागाला कधी मान्यता दिली जाईल, हे अजून जाहीर केले गेलेले नाही.