नवी दिल्ली -देशाची राजधानी दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाजवळ झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटाची गंभीर दखल तपास यंत्रणांनी घेतली आहे. स्फोटाआधी घटनास्थळाजवळ असणाऱ्या रस्त्यावरून दोन तरूण चालत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपले. त्या अज्ञात तरूणांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, स्फोटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
इस्त्रायली दुतावासाजवळ मंगळवारी सायंकाळी स्फोट झाला. सुदैवाने, स्फोटाची तीव्रता कमी असल्याने कुठलीही हानी झाली नाही. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर बुधवारी सकाळी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) आणि न्यायवैद्यक तज्ञांच्या पथकांनी घटनास्थळाला भेट दिली.
त्यांच्या समवेत श्वानपथकही होते. स्फोटासाठी एखाद्या रसायनाचा वापर झाल्याचा संशय आहे. ते शोधण्यासाठी न्यायवैद्यक तज्ञांनी घटनास्थळावरील गवत आणि झुडूपांच्या पानांचे नमुने गोळा केले. स्फोटासंदर्भात दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
स्फोटानंतर घटनास्थळाजवळ एक पत्र आढळले. ते इस्त्रायली राजदुतांना उद्देशून लिहिण्यात आले होते. त्यामध्ये आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलेल्या त्या पत्रात पॅलेस्टाईन, गाझा आदी उल्लेख असल्याचे समजते. काही महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाची सुरक्षा आधीच वाढवण्यात आली होती. आता स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीतील महत्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.