प्रतिनिधी
“ट्यूलिप’ या पुस्तकातून भाव-भावनांचा सुरेख आविष्कार लेखिका नेहा हवेली यांनी उत्तमरित्या साकारला आहे. ट्यूलिप हा लेखसंग्रह असून अनेकविध विषयांवरील लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. जीवन वाटचालीत घडलेले प्रसंग, भेटलेली माणसं यातील वेगळेपण, तर निसर्गरम्य वातावरणात आनंद घेण्याची आवड त्यांनी काही लेखांत मांडली आहे. परदेशी जाण्याची संधी लाभल्यावर केवळ फिरायला जाणे, हा हेतू न बाळगता तेथील लोकसंस्कृती, प्रेक्षणीय स्थळांची माहिती हे सहजतेने सांगितले आहे.
छोट्या-छोट्या प्रसंगातून किंवा घटनेतून प्रभावी विचार मांडण्याची लेखिकेची निरीक्षणशक्ती वाचकांच्या मनावर ठसते. तसेच लालित्यपूर्ण शैलीत केलेले वर्णन प्रभावशाली आहे. “क्षण आनंदाचे’ या लेखात वर्णन केलेले निसर्ग सानिध्यातील वेचलेले क्षण सर्वांना हवेहवेसे वाटतात; कारण जीवनात प्रत्येकालाच आनंद हवा असतो.
अमेरिकेला जाण्याचे स्वप्न साकारल्याचे “अन् स्वप्न साकारले’ या लेखात लेखिकेने सविस्तर लिहिले आहे. दोन महिन्यांच्या वास्तव्यात तेथील प्रेक्षणीय स्थळांना दिलेल्या भेटी, तिथली जीवनशैली, वातावरण, संस्कृती याविषयीची ओळखही या लेखात समपर्कतेने केली आहे. अजय-अतुल ही भाऊ-भाऊ असलेली संगीतकार जोडी. सर्वांना संगीत क्षेत्रातील त्यांचे काम माहिती आहे. मात्र, लहान असताना नारायणपेठेत एका वाड्यात आम्ही वास्तव्यास होतो तेव्हाची ही आठवण “अतुल्य जय’ या लेखात सहज जाता जाता सांगितली आहे.
महेंद्र कपूर हे हिंदी चित्रपटातील गायक म्हणून लोकप्रिय आहेत तसेच काही मराठी चित्रपटांत तयांनी गायलेली गाणी प्रसिद्ध आहेत. याबद्दलची आठवण “आठवणींतील महेंद्र कपूर’ या लेखात देताना चित्रपटाचे नाव व गीते यांची माहिती लेखिकेने दिली आहे. “पौर्णिमांची सम्राज्ञी’ हा लेख कोजागिरी पौर्णिमेचे वेगळेपण सांगून जातो तर “नको वाजवू श्रीहरी मुरली’ या लेखातून मुरलीधर श्रीकृष्णाची बासरी वेळू बेटातून आली. काही लेख त्यांच्या ललितलेखन शैलीमुळे वाचकांना लक्षात राहतात. तसेच एकंदरीत साध्या-सोप्या, सरळतेने लिहिण्यातून पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे.
प्रकाशक – स्वरमहिमा प्रकाशन: एकूण पृष्ठे – 80, मूल्य – 100 रुपये