पुणे – अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांतील आतापर्यंत 38 टक्के विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ही माहिती तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली आहे.
तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नित पदविका संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि लसीकरणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबतचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. त्यानुसार मंडळाने पहिली आणि दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सर्व तांत्रिक पदविका संस्थांकडून मागविली होती. त्यातून ही माहिती समोर आली.
15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 45 हजार 729 इतकी आहे. त्यापैकी लसीचे पहिली डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 61 हजार 93 (41 टक्के), तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 29 हजार 814 (20 टक्के) इतकी आहे.
तर 18 वर्षावरील लसीकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 20 हजार 118 आहे. त्यापैकी लसीचे पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 25 हजार 563 (21टक्के), तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 72 हजार 62 (59 टक्के) एवढी आहे.