सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न

खा. शरद पवार : शेतकरी हिताचे सरकार आणावे

फलटण – सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. तथापि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे लोकशाही टिकून असल्याचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात एकही औद्योगिक वसाहत उभी राहिली नाही. शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली नाही. या सरकारला फक्त “खाणाऱ्यां’ची काळजी आहे. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार निवडून आणा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
फलटण येथे संजयमामा शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ना. रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, आ. जयदेव गायकवाड, दादाराजे खर्डेकर, सुभाषराव शिंदे, दिलीपसिंह भोसले, डी. के पवार, जयंत भंडारे, मंगेश धुमाळ उपस्थित होते.

खा. शरद पवार म्हणाले, आमच्या सत्ता काळात पडलेल्या दुष्काळाशी सामना करताना जनावरे वाचवण्यासाठी हजारो चारा छावण्या सुरू करून पशुधन वाचवले. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग सुरू केले. मात्र आजच्या राज्यकर्त्यांना दुष्काळाशी सामना करताना काय तयारी करावी लागते याची जाणीव नसल्याने ते गोंधळून गेले आहेत. मोदींच्या काळात एकही औद्योगिक वसाहत सुरू झाली नाही. युवकांना नवीन नोकऱ्या नाहीत. शेती पिकवण्यासाठी भांडवल लागते पण थकबाकी हीच मोठी चिंता आहे. मोदी यांनी अकलूजच्या सभेत दुष्काळ, शेतकरी, उद्योगधंदे याबाबत न बोलता माझ्याबाबत बोलत राहिले.

आम्ही मागील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची 70 हजार कोटींची थकबाकी माफ करुन पुन्हा शेतकरी उभा केला. फलटण बारामती भागातील कपाशीचे पिक बोंडअळीमुळे गेल्याने शेतकरी अडचणीत आला. तथापि कर्ज माफीच्या निर्णयामुळे पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागले. त्याही पुढे जाऊन काही कालावधीत हिंदुस्थान तांदूळ उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला. शेतकऱ्यांना भांडवल देऊन केळी उत्पादन वाढविले. मात्र सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत शेतकरी हिताचे सरकार आणणे गरजेचे आहे.

ना. रामराजे म्हणाले, प्रचारादरम्यान विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. भाजपचा उमेदवार माझा पुतण्या नाही हे वास्तव आहे. त्यातच यांचे वडील हिंदुराव 1996ला आमच्या चुकीमुळे खासदार झाले. विकृत विचारसरणीच्या या उमेदवाराला 2009मध्ये आम्ही ताकद दिली नसतीतर स्वराज दुधाचे तीन-तेरा वाजले असते. हाच माणूस आज आम्हाला विरोध करतो. तेव्हा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. या ढोंगी माणसाच्या दूध डेअरीला 320 कोटी कर्ज आहे. ही वस्तुस्थिती असताना मी केलेल्या विकासकामाची किंमत मतदारांना असेल तर विरोधी रणजित नाईक निंबाळकर यांची अनामत रक्कम घालवा. सुभाषराव शिंदे, डी. के. पवार, आ. दिपक चव्हाण, आ. जयदेव गायकवाड, मंगेश धुमाळ यांची भाषणे झाली. संजय शिंदे यांनी भाषणात केलेल्या कामाचा आढावा घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.