शनिशिंगणापूर – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनीदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश खुला करण्यात आला. मात्र, करोना काळापासून तेथे सर्वांनाच प्रवेश बंद करण्यात आला असताना भूमाता महिला बिग्रेडचे तृप्ती देसाई सोमवारी रात्री अचानक शनिशिंगणापूरमध्ये आल्या आणि त्यांनी थेट चौथऱ्यावर जाऊन शनीदर्शन घेतले.
काही वर्षांपूर्वी देसाई यांचे हे आंदोलन गाजले होते. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर त्या पुन्हा शनिशिंगणापूरला आल्या. सोबतच्या कार्यकर्त्यांसह त्या चौथऱ्यावर गेल्या, शनिदेवाला तेल व फुले अर्पण केली. त्यांच्यासोबत शीतल पाटील, रेणुका देसाई, जयश्री काळे, मंदा माकोणे, हर्षल पाटील, हरिभाऊ तुवर, रवी देशमुख, कुंदन बाचकर उपस्थित होते. शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी देसाई यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना देसाई यांनी शनी देवाकडे काय प्रार्थना केली याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, राज्य सरकारमधील तीन पक्ष व विरोधी पक्ष सध्या एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत. त्यातून सुरू असलेला हा राजकीय तमाशा राज्याच्या मुळीच हिताचा नाही. महाविकास आघाडीसह विरोधी पक्षातील नेत्यांना सुबुद्धी द्यावी, बलात्कार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी, अशी प्रार्थना आपण केली आहे. चौथरा महिलांसह सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय झाला.
मात्र, करोना काळानंतर सुरक्षेचे कारण देत चौथऱ्यावर महिला आणि पुरुष सर्वांनाच प्रवेश बंद करण्यात आला आहे. बऱ्याच कालावधीनंतर देसाई पुन्हा शनिशिंगणापूरला आल्या आणि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले. विशेष म्हणजे यावेळी त्यांना विरोध नाही, तर स्वागतच झाले.