चीन व भारत यांचे दरम्यान लवकरच मैत्रीचे संबंध?
कलकत्ता, दि. 22 – चीनचे उपपंतप्रधान चेन-ही-लियेन यांनी येथे असे सांगितले की, चीन व भारत यांचे दरम्यान स्नेहाचे संबंध लवकरच प्रस्थापित होतील. आजच्यासारखी तेढीची व विपर्यास करण्याची वृत्ती फार काळ टिकणार नाही. वास्तविक चीन व भारत यांची मैत्रीची परंपरा फार प्राचीन आहे. मि. चेन लियेन हे पेकिंगहून काठमांडूकडे जाताना वाटेत थोडावेळ येथे थांबले होते.
कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई केली जाईल
मुंबई – कायदा हातात घेण्याचा जर कुणीही प्रयत्न केला तर त्याविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दिला. जोपर्यंत एखादी संघटना शांततेने कार्य करीत आहे तोपर्यंत कारवाईचा प्रश्नच येत नाही. जर त्यांनी कायदा हातात घेतला तर मात्र कारवाई केली जाईल.
कॉंग्रेस कम्युनिस्ट होत आहे हा आरोप खोडसाळ
मद्रास – कॉंग्रेस पक्षाचे रूपांतर कम्युनिस्ट पक्षांत होत आहे हा प्रचार खोडसाळपणाचा असून कॉंग्रेस पक्ष फोडण्यासाठी तो चालू आहे, अशी टीका पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली. त्या म्हणाल्या, कॉंग्रेस पक्षातील कुणालाच कम्युनिस्टांच्या मार्गाने जावयाचे नाही. काही लोक आमच्यात फूट पाडण्यासाठी कम्युनिस्ट नेत्यांच्या उद्गारांचा उपयोग करीत आहेत. पण ते काय म्हणतात याचा आम्हाला विचार करावयाचे कारण नाही. कारण आम्हाला निश्चित दिशा आहे.
अमेरिका पाकला शस्त्रे देणारच
वॉशिंग्टन – पाककडे अमेरिकेने शस्त्रनिर्यात बंदी गेली 10 वर्षे घातली होती ती आता उठविण्यात आली असून पाकला आता संरक्षण शस्त्रसामग्री देण्याचे ठरविले आहे. भारताने या शस्त्रविक्रीला विरोध केला असता त्याला अमेरिकेने जुमानलेले नाही.