वॉशिंग्टन – ट्रम्प समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरवर्णीय राष्ट्रवाद्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण लागले. त्यात किमान चार जणांना भोसकण्यात आले. या निवडणुकीचे निकाल बदलण्याची मागणी करत ही निदर्शने सुरू करण्यात आली.
या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे वॉशिंगटन अग्निशामक दलाचे प्रवक्ते डोऊद बुचानन यांनी सांगितले. मात्र, हल्लेखोर आणि जखमी झालेले कोणत्या गटाचे आहेत त्याचा नेमका उलगडा तातडीने होऊ शकला नाही.
सकाळी कृष्णवर्णीयांची वस्ती असणाऱ्या मॅटर प्लाझा फ्रॅंकलीन स्कवेअर भागात या निदर्शनांविरोधात निदर्शने सुरू झाल्याने हिंसाचाराला सुरवात झाली. पोलिसांनी 23 जणांना अटक केली आहे. त्यात 10 जणांवर विनाकारण मारहाण करणे, सहा जणांवर पोलिसांवर हल्ले करणे आणि चार जणांवर दंगल घडवल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन पोलीस जखमी झाले असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आणि निदर्शक मिळून एकूण आठ जण जखमी झाले आहेत.
ज्यो बायडेन यांना विजयी घोषित केल्यानंतर ट्रम्प समर्थकांनी दोनदा निदर्शने केली आहेत. नागरीकांनी फटाके उडवून मोठा गोंगाट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर सुरू केला आहे. कृष्णवर्णीय बहूल असणाऱ्या चार राज्यातील मते गृहीत धरू नयेत अशी टेक्सासच्या ऍटर्नी जनरलनी केलेली याचिका फेटाळल्यानंतर या निदर्शनांना सुरवात झाली होती. न्यायालयाच्या या निकालावर ट्रम्प यांनी नापसंती व्यक्त केली होती.