वॉशिंग्टन – कोविड-19 च्या मदतीच्या पॅकेजच्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. सर्व अमेरिकेसाठी 600 डॉलरचे पॅकेज पुरेसे नाही. त्यामुळे किमान 2 हजार डॉलरचे पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी ट्रम्प यांनी केली आहे.
मंगळवारी रात्री ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी या पॅकेजबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. इतर देशांमध्ये अशा पॅकेजद्वारे मोठी मदत दिली गेली आहे. मात्र अमेरिकेतील नागरिकांना तशी मदत मिळालेली नाही. काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसने अशा मदतीच्या पॅकेजबाबत वाटाघाटी सुरू केल्या होत्या. मात्र संसदेने आपल्याकडे पाठवलेले विधेयक अपेक्षेपेक्षा खूपच वेगळे आहे. हे खूपच निराशाजनक आहे, असे ट्रम्प म्हणाले. या पॅकेजसाठीच्या वाटाघाटींमध्ये अर्थमंत्री स्टिव्हन मुनचीन यांचाही समावेश होता.
“900 अब्ज डॉलरच्या पॅकेजमधील सर्व अनावश्यक खर्च केल्यानंतर सर्वसामान्य करदात्यांसाठी केवळ 600 डॉलर उपलब्ध होत आहेत. विशेषतः करोनाच्या साथीचा गंभीर फटका बसलेल्या रेस्टॉरंट आणि लघुउद्योजकांसाठी या पॅकेजमध्ये काहीही तरतूद नाही.’ असे ट्रम्प यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
या विधेयकात दुरुस्ती करून प्रत्येक दाम्पत्याला 2 हजार ते 4 हजार डॉलरच्या मदतीचे पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी ट्रम्प यांनी केली. तसेच या विधेयकातील अनावश्यक खर्च वगळावा आणि हे विधेयक नव्याने आपल्याकडे पाठवावे. अन्यथा करोना मदतीचे पॅकेज पुढील प्रशासनाकडूनच दिले जाईल, असेही ट्रम्प यांनीही म्हटले आहे.
अमेरिकेच्या संसदेने सोमवारी करोनामुळे आर्थिक नुकसान झालेल्या व्यक्तींना आणि उद्योगांना 600 डॉलरची मदत देण्याचे विधेयक मंजूर केले. हे विधेयक स्वाक्षरीसाठी अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आले.