वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर पहिली चर्चा झाली. यावेळी दोघांनीही एकेमकांवर प्रच्छन्न आरोप करून एकमेकाच्या निवेदनाच्यावेळी अडथळे आणले आणि एकमेकांच्या कुटुंबीयांच्या नावाने चिखलफेक केल्याने ही चर्चा चांगलीच वादळी ठरली.
क्लीव्हलॅंड येथे ही चर्चा झाली. सुरुवातीला बिडेन यांनी ट्रम्प यांनी चीनशी केलेल्या व्यापारी कराराचा विधायक परिणाम दिसून न आल्याची टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी त्यांना मध्येच अडवत तुमच्या मुलाचे विदेशात काय व्यवहार चालतात याची आपल्याला कल्पना असल्याचे सांगत त्यांच्याशी वाद घातला.
ट्रम्प यांनी यावेळी असा आरोप केला की बिडेन यांचा मुलगा हंटर याने चीनशी अनेक बेकायदेशीर व्यवहार करून लक्षावधी डॉलर्सचा नफा कमावला आहे. त्यांचा हा आरोप बिडेन यांनी जागच्या जागी धुडकावून लावला आणि ट्रम्प व त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यवहारांविषयी आपण संपूर्ण रात्रभर बरेच काही बोलू शकतो असा दावा करीत त्यांना पुन्हा डिवचले.
त्यांच्या या दाव्याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, माझ्या मुलांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून सरकारी काम पत्करले आहे. त्यांना समाजाची व देशाची सेवा करायची असल्याने त्यांनी सरकारी कामासाठी आपल्या नोकऱ्यांवर पाणी सोडले आहे.
त्यांचे हे निवेदन सुरू असतानाच बिडेन यांनी ट्रम्प यांना अडवले आणि त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ट्रम्प यांनी सूत्र संचालक आणि बिडेन यांच्याकडे दुर्लक्ष करून कॅमेऱ्याकडे पाहून थेट निवेदन सुरू ठेवले.
ते म्हणाले की, हा विषय माझ्या कुटुंबीयांविषयी किंवा बिडेन यांच्या कुटुंबांविषयी नाही तर तुमच्या (मतदारांच्या) कुटुंबीयांविषयीचा आहे. या चर्चेच्यावेळी दोघांनाही एकमेकांवर ते खोटारडे असल्याचाही आरोप केला.