नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष 2018 -19 साठीचे प्राप्तिकर विवरण सादर करण्याची तारीख दोन महिन्यांनी वाढवून 30 नोव्हेंबर केली आहे. कर विभागाला कर संकलन वाढविण्यासाठी मदत व्हावी याकरिता असे केल्याचे बोलले जाते. या कालावधीत कर विभाग जास्तीत जास्त करदात्यांना विवरण सादर करण्याचा आग्रह करण्याची शक्यता आहे.
प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळामध्ये करदात्यांना काम करता आले नाही. या सर्व बाबींचा विचार करून आर्थिक वर्ष 2019-20 साठीचे विलंब व दुरुस्तीचे विवरण सादर करण्याची तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासाठीची अगोदरची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती. विवरण भरण्यासाठी ही चौथी मुदतवाढ देण्यात आली आहे.
याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, करदात्यांनी विवरण सादर करावे यासाठी कर विभागाला आणखी काही काळ प्रयत्न करता येतील. गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभाग ज्यांच्याकडे अधिक उलाढाल झाली आहे, त्यांच्याकडे एसएमएस आणि ई-मेल पाठवून विवरण सादर करण्याचा आग्रह करीत आहे. त्यासाठी आणखी काही काळ उपलब्ध होणार आहे.