शाळा, कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर
नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक-5 अंतर्गत नवी नियमावली जारी करताना प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील आणखी काही व्यवहार सुरू करण्याला परवानगी दिली. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून निम्म्या क्षमतेने (50 टक्के आसनक्षमता) चित्रपटगृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
चित्रपटगृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स खुले करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. त्या सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी केल्या जातील. देशात 15 ऑक्टोबरपासून आणखी काही बाबींना परवानगी मिळाली आहे.
त्यामध्ये बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन्सचा समावेश आहे. त्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना वाणिज्य मंत्रालय जारी करेल. केवळ क्रीडापटूंसाठी जलतरण तलाव वापरले जाऊ शकणार आहेत. मनोरंजन पार्क आणि त्यासारखी ठिकाणेही खुली होऊ शकणार आहेत.
शाळा आणि कोचिंग इन्स्टिट्यूट 15 ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा निर्णय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर सोपवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंदच ठेवली जाणार आहेत. केवळ केंद्र सरकारची परवानगी असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे होऊ शकतील.