बाली, (इंडोनेशिया) – ‘जी-20′ परिषदेदरम्यान (G20 Summit in Bali) कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Trudeau-Xi Jinping) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. कॅनडामध्ये चीनकडून करण्यात येत असलेल्या हस्तक्षेपाबाबत ट्रुडो यांनी जिनपिंग यांच्याबरोबरच्या चर्चेत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यातील सविस्तर संभाषण ट्रुडो यांच्या प्रसिद्धी विभागाने प्रसिद्ध केल्यावर जिनपिंग यांनी याबद्दल कॅनडाकडे तक्रार नोंदवली आहे.
“आमच्यात जे काही बोलणे झाले, त्याचा सविस्तर तपशील वर्तमानपत्रामध्ये छापून आला आहे. हे योग्य नाही. संभाषण करण्याची ही योग्य पद्धत नाही.’ असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. जिनपिंग यांच्या या प्रतिक्रियेचे वृत्त काही इंग्रजी दैनिकांनी प्रसिद्ध केले आहे.
जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर एकमेकांशी अत्यंत आदरयुक्त संभाषण केले पाहिजे. अन्यथा याचे परिणाम काय होतील, हे निश्चितपणे सांगता येणार नाही, असे जिनपिंग म्हणाले. त्यावर ट्रुडो यांनी केवळ मान हलवून प्रतिसाद दिला. अर्थात जिनपिंग चिनी बाषेतून बोलले असल्यामुळे ते काय बोलले हे ट्रुडो यांना समजले नसावे. ते केवळ अनुवाद केला जाण्याची वाट बघत असावेत.
या संभाषणाचा एक व्हिडीओ देखील एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला आहे. यावेळी दोन्ही नेते हस्तांदोलन करत एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. त्यांच्यात जे काही थोडे संभाषण झाले तो सुसंवाद नव्हता, एवढे मात्र नक्की आहे.