मुंबई – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक G20 परिषदेच्या निमित्ताने भारतात आले आहेत. यानंतर आज सकाळी ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसोबत अक्षरधाम मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी सर्व विधींसह स्वामी नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरातील वेळी मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सकाळपासून पाऊस पडत असताना देखील ते दर्शनासाठी पोहचले होते.
मंदिरात त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. त्यानंतर मंदिराची आठवण व्हावी म्हणून मंदिराचे मॉडेल ऋषी सुनक यांना भेट म्हणून देण्यात आले. दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली होती. सुनक म्हणाले, “पंतप्रधान मोदींबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि G-20 परिषद यशस्वी करण्यासाठी आपण मोदींना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. यावेळी सुनक यांनी मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. याच संस्कृतीतून माझे पालनपोषण झाले. पुढील काही दिवस मी इथे भारतात आहे, त्यानिमित्ताने मी मंदिरांना भेट देणार असल्याचेही सांगितले होते.
दरम्यान, नवी दिल्ली येथे 9 आणि 10 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषद होत आहे. जी-20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी आज 9 देशांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. दोन दिवसीय शिखर परिषद भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे कारण देशाने पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन केले आहे. या मेगा इव्हेंटसाठी सुरक्षा व्यवस्था आणि नागरी पायाभूत सुविधांसह व्यापक तयारी करण्यात आली आहे.
तर, शिखर परिषदेच्या संध्याकाळी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून उपस्थित सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी शाही भोजनाचे काल आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनातील मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, सचिव, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले होते.