Russia-Ukraine war : रशियाचे क्षेपणास्त्र पोलंडमध्ये पडले, 2 ठार; पोलंडसह पाश्चात्य देशांकडून संताप व्यक्त

पर्जेवोदो (पोलंड) – रशियाने युक्रेनवर काल डागलेल्या शेकडो क्षेपणास्त्रांपैकी एक क्षेपणास्त्र पोलंडमध्ये पडले. यामुळे दोन जण ठार झाले आहेत. या घटनेमुळे पोलंडसह अमेरिका आणि बहुतेक सर्व पाश्चात्य देशांनी रशियाबाबत तीव्र संतापाची भावना व्यक्त केली आहे. हे क्षेपणास्त्र रशियाने मुद्दाम पोलंडवर डागले नसावे, असा अंदाज आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन आणि पोलंडचे अध्यक्ष अँद्रेझ दुदा यांनी ही रशियाने मुद्दाम केलेली कृती असावी, असे म्हटले आहे. मात्र या प्रकाराचा तपशीलवार तपास केल्यानंतरच त्याबद्दल काही भाष्य करता येऊ शकेल, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
हे क्षेपणास्त्र युक्रेनच्या सीमेशेजारच्या पोलंडच्या हद्दीतील एका शेतात पडले. रशियाच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी युक्रेननेच डागलेले हे क्षेपणास्त्र असावे, असा अंदाज अमेरिकेच्या काही निरीक्षकांनी व्यक्त केला आहे. या निरीक्षकांचे मत आणि “जी-20’मध्ये बायडेन यांनी व्यक्त केलेले मत परस्पर भिन्न आहे.
पोलंड आणि अन्य पाश्चात्य देशांनी केलेल्या टीकेला रशियानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पोलंडची टीका कोणत्याही पुराव्याशिवाय असल्याचे रशियाचे प्रवक्ते दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.
Dubai : इस्रायलच्या तेलाच्या टॅंकरवर ओमानचा ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला; आतापर्यंत कोणीही….
‘नाटो’कडून तातडीची दखल
पोलंड हा “नाटो’ आणि युरोपीय संघाचा सदस्य देश आहे. त्यामुळे पोलंडमध्ये पडलेल्या क्षेपणास्त्राची “नाटो’ने तातडीने दखल घेतली आहे. ब्रुसेल्समध्ये “नाटो’च्या सदस्य देशांनी तातडीची बैठक बोलावली आहे. “नाटो’कडून या विषयावर त्वरित प्रतिक्रिया दिली जाण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्र प्रकरणाचा तपास केला जायला पाहिजे, अशी आग्रही भूमिका जर्मनी आणि ब्रिटनने व्यक्त केली आहे. मात्र या विषयी त्वरित कोणताही निष्कर्श काढण्यात येऊ नये, असे जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्चोल्झ यांनी म्हटले आहे. रशियाच्या कुरापती वाढत चालल्या असल्याचे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. चीनने मात्र या प्रकरणी संयमी आणि शांत राहण्याचे आवाहन केले आहे.





