नगर-बारामती मार्गावर ट्रक उलटण्याचे सत्र सुरूच

कासवगतीच्या कामाने कुरकुंभ परिसरात अवजड वाहनांचे अपघात वाढले

कुरकुंभ -कुरकुंभ गावातून जाणाऱ्या अहमदनगर-दौंड-कुरकुंभ-बारामती-फलटण या महामार्गाचे काही भागात सध्या काम सुरू आहे. या महामार्गावरील कुरकुंभ, जिरेगाव (ता. दौंड) हद्दीत बऱ्याच दिवसांपासून हा रस्ता खोदून ठेवलेल्या अवस्थेत आहे, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

या हद्दीत अवजड वाहने उलटण्याच्या सत्राची जणू मालिकाच सुरू असल्याचे चित्र सध्या परिसरात आहे. आज (दि. 31) दौंडकडून बारामतीकडे जात असलेला एक अवजड वाहन (ट्रक) उलटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

या महामार्गावर कुरकुंभ व जिरेगाव परिसरात 04 ऑगस्ट आणि 20 ऑक्‍टोबर 2019 ला ट्रक उलटण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र संबधित विभागाने या घटनेकडे कानाडोळा केल्याने आज कुरकुंभकडून बारामतीकडे जाणारा ट्रक रस्त्यावर उलटल्याची घटना घडली.

रस्त्याच्या अर्धवट कामामुळे प्रवाशांना, तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थांना या अर्धवट रस्त्याचा सामना करावा लागत आहे. आज झालेल्या अपघाताने तरी संबधित विभाग जागा होईल का, असा प्रश्‍न नागरिक करीत आहेत. या मार्गावरील कुरकुंभ-जिरेगाव हद्दीतील रस्ता बऱ्याच महिन्यांपासून खोदलेल्या अवस्थेत आहे. महामार्गाचे काम सुरू असतानाच या परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता.

“मोबदला द्या – मगच काम सुरू करा’, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. या कामास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने हे काम बंद केले गेले. मात्र, बरेच दिवस होत आले तरी हा रस्ता खोदलेल्या अवस्थेतच आहे. सध्या कुरकुंभ हद्दीत बऱ्यापैकी रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, कामाची कासवगतीने असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

महामार्गाच्या कामाला आमचा विरोध नाही; पण अधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांना विचारात घेऊन जमिनीचा योग्य मोबदला देऊन काम करण्यात यावे. बऱ्याच ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. अर्धवट रस्त्यामुळे या हद्दीत अपघात वाढू लागले आहेत. भविष्यात आणखी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबधित विभागाने त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी.
भरत खोमणे, सरपंच, जिरेगाव (ता. दौंड)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.