पुढे स्वच्छतेचा फिडबॅक अन्‌ मागे अस्वच्छता

कराड – येथील बसस्थानक या ना त्या कारणाने नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. गुरूवार पासून बसस्थानक परिसरात कराड नगरपालिकेकडून स्वच्छतेचा फिडबॅक घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी एका पथकाची नेमणूक करण्यात आली असून हे पथक आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. मात्र बसस्थानक परिसरात असणाऱ्या अस्वच्छतेकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत शहरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

स्वच्छ सर्वेक्षण मोहितेअंतर्गत शेवटच्या टप्प्यात नागरिकांचे प्रतिक्रियांना काही गुण देण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कराड नगरपालिकेकडून युद्धपातळीवर मोहिम सुरू आहेत. शहरातील प्रत्येक पेठ, गल्ली, संस्था, कार्यालये, हॉस्पिटल्स, बॅंका, पतसंस्था या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात येत आहेत.

कराड शहराला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचविण्यासाठी पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था करत असलेले काम खूपच कौतुकास्पद आहे. गेल्या काही महिन्यात शहरात करण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे शहराचा लुक पूर्णत: बदलला आहे. शहरात प्रवेश करताना आय लव्ह कराड व कारंजाने नागरिकांचे स्वागत होते. त्यानंतर प्रत्येक चौकात व महत्त्वाच्या ठिकाणी विविध प्रकारची शिल्पे बसविण्यात आली असून ती लक्ष वेधून घेत आहेत.
मुख्याधिकारी यशवंत डांगं यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व पदाधिकारी झटून काम करत आहेत.

परंतु पालिकेच्या या प्रयत्नाला काही संस्था काळिमा फासण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात कराड बसस्थानकाचा प्रथम क्रमांक लागेल. पालिकेच्या वतीने बसस्थानक परिसरात अनेकवेळा महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. तसेच तेथील आगारप्रमुख व व्यवस्थापकांना अनेकवेळा स्वच्छतेबाबत तंबी देण्यात आली आहे. मात्र बसस्थानक प्रशासनावर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही.

कराडचे बसस्थानक हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे सतत प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे सर्वात जास्त कचरा या परिसरात होणे स्वाभाविक आहे. परंतु तेथील प्रशासनाने स्वच्छतेची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. परंत्‌ु तसे होत नाही. बसस्थानक परिसरात सतत कचरा साठलेला दिसतो. तेथील स्वच्छतागृहे नेहमी अस्वच्छ असतात. तेच पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी सर्वत्र गुटख्याचेच फवारे असून परिसरात त्याची दुर्गंधीही पसरते.

मात्र त्याकडे बसस्थानक प्रशासनाचे दुर्लक्ष होते. स्वच्छ सर्वेक्षणच्या फीडबॅकनिमित्त पालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी दोन दिवस बसस्थानकात तळ ठोकून होते. मात्र हे पदाधिकारी फीडबॅकच्या कामात गुंतल्याने त्यांचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले दिसले. पुढे स्वच्छतेचा फीडबॅक आणि मागे दुर्गंधी व अस्वच्छता अशीच चर्चा नागरिकांमधून दिवसभर सुरू होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.