उद्यान देखभालीच्या निविदेत अनागोंदी

चार महिन्यांनी उघडली निविदा : अपात्र ठेकेदार ठरविले पात्र

पिंपरी – ठेकेदारांना काम देण्याची प्रक्रिया नेहमीच संशयाच्या विळख्यात अडकलेली असते. पिंपरी चिंचवड महापालिकेत तर कित्येक नव-नवीन प्रकार पहायला मिळतात. उद्यान देखभालीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियावर ही सध्या प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असून, या निविदेमध्ये अपात्र ठेकेदारांना पात्र ठरवून भ्रष्टाचार झाल्याचे आरोप देखील होत आहेत.

उद्यान देखभालीसाठी मागविलेलया निविदेमध्ये अनागोंदी झाल्याचे समोर आले आहे. 23 सप्टेंबर 2019 रोजी सादर केलेल्या निविदा तब्बल चार महिन्यांनी महापालिकेने उघडल्या आहेत. या निविदांपैकी दोन ठिकाणी रिंग झाली आहे. तीन निविदांमध्ये अपात्र ठेकेदाराला कंत्राट देण्याची घाई महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे या निविदा रद्द करून अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

महापालिकेने उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती, स्वच्छतागृहाच्या सफाईच्या 14 कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. दोन वर्षांच्या कामांसाठी या निविदा आहेत. त्यापैकी 5 कोटी 97 लाख रुपयांच्या पाच निविदांमध्ये अनागोंदी झाला आहे.

तांत्रिक आणि अर्थिक पाकिट एकाच दिवशी उघडण्यात आले आहे. त्यामध्ये भोसरी सहल केंद्रातील उद्यानाच्या 1 कोटी 85 लाख आणि भोसरी प्राधिकरण पेठ क्रमांक सात येथील 1 कोटी 28 लाख रुपयांच्या कामात रिंग झाल्याचे समोर आले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाच्या 95 लाख 55 हजार, निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान 1 कोटी 64 लाख आणि दुर्गा देवी उद्यानातील 1 कोटी 50 लाख या कामाच्या अपात्र ठेकेदारांने उद्यान अधीक्षकांनी चुकीचे दाखले दिले आहेत. त्या आधारे त्यांना पात्र केले आहे.

नियमांकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष
तांत्रिक आणि अर्थिक पाकीट एकाच दिवशी उघडले आहे. तांत्रिक पाकिट उघडल्यानंतर तीन दिवसांनी अर्थिक पाकिट उघडणे आवश्‍यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून तीन दिवसांची मुदत दिली गेली नाही. तसेच सूचना व हरकतींनाही वेळ दिला नाही. दराचे पाकीट उघडताना एकाही ठेकेदाराला न बोलविताच पाकिट उघडण्यात आले आहे. गुरुजी इन्फ्रास्ट्रक्‍चर ही संस्था मजूर पुरविण्याचे काम करते. मजूर पुरविणे हे काम उद्यानाच्या निविदेसाठी यापूर्वी कधीही ग्राह्य धरले नाही. मात्र या निविदेमध्ये या ठेकेदाराला पात्र करण्यात आले आहे. अजित स्वंयरोजगार संस्थेलाही चुकीच्या पद्धतीने पात्र केले आहे. या दोन्ही संस्थानी एफडीआर, डीडी स्कॅन जोडले नसल्याने त्यांना अपात्र करणे आवश्‍यक होते, असे आरोप होऊ लागले आहेत.

राजकीय व्यक्तींच्या आशिर्वादाने ही कामे ठेकेदारांना मिळाली आहेत. या निविदेमध्ये अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आले आहे. हा खूप मोठा भ्रष्टाचार असून महापालिकेच्या पैशावर डल्ला मारला जात आहे. याची चौकशी करून त्वरित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी. तसेच यापुढे अशा चुकीच्या पद्धतीने निविदा उघडण्याची घाई प्रशासनाने करू नये.
– मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते


तांत्रिक पाकिट उघडून बरेच दिवस झाले आहेत. तांत्रिक व अर्थिक पाकिटे एकाच दिवशी उघडली नाहीत. त्यावर ठेकेदारांचे एकमेकांविरोधात आक्षेप असल्याने तपासणी करण्यात आली. पात्र अपात्र निश्‍चितीत वेळ गेला. त्यामुळे अर्थिक पाकिट उघडण्यास वेळ लागला. याबाबत ऑडिटरकडून तपासणी केली जाईल.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त पि. चिं. महापालिका.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.