कोंढवा (पुणे) – ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रकने 8 ते 10 वाहनांना धडक दिली आहे. ही घटना गुरूवारी (दि. 10) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कोंढवा बु्द्रुक स्मशानभूमी जवळ घडली आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहे. प्रशांत कृष्णा चौरे (वय 43, रा. धनकवडी, पुणे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रकने धडक दिलेल्या वाहनांमध्ये स्कूलबसचाही समावेश आहे मात्र सुदैवाने या घटनेत स्कूलबसमधील मुलांना कोणतीही इजा झाली नाही. ट्रकचालक रामभाऊ काकडे (वय 22, रा. साबळा, केज, जि. बीड) याला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तेजस काकडे हा सिमेंटचे पाईप असलेला ट्रक कात्रज कोंढवा खडीमशीनच्या दिशेने जात होता. यावेळी ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. परिणामी ट्रकची पुढील 8 ते 10 वाहनांना धडक बसली. या दुर्घटनेत दुचाकीवरील प्रशांत चौरे यांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर भारती हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पाहणी केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघातग्रस्त वाहनांमध्ये स्कुलबससह दुचाकी, टेम्पो, कारचा समावेश आहे. स्कुलबस ही उंड्री येथील संस्कृती स्कूलची आहे. या बसमध्ये 40 विद्यार्थी होते, दुर्घटनेत बसचे नुकसान झाले आहे मात्र कोणतीही जीवीतहानी झाली नाही. बसचालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाता मृत्यू पावलेले प्रशांत चौरे हे गोकुळनगर येथून दुसऱ्याच्या दुचाकीला लिफ्ट मागून खडीमशीनपर्यंत निघाले होते. परंतू त्याठिकाणी पोहचण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अरुंद व खाचखळग्याच्या रस्त्यामुळे निष्पापाचा बळी गेला आहे.