‘स्मार्ट हेल्मेट’ पेटंटसाठी डॉ. प्रा. निशा औटी यांनी केले मार्गदर्शन
पुणे – येथील ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड रीसर्चच्या आयटी विभागातील विद्यार्थी राकेश भक्ता याने “स्मार्ट हेल्मेट’ बनवण्याची कल्पना विभागप्रमुख डॉ. निशा औटी यांच्यासमोर मांडली. त्यांनी यावर अभ्यास, रीसर्च करून या कल्पनेचे पेटंट करण्यासाठी प्रयत्न केले.
“स्मार्ट हेल्मेट’मध्ये वेगवेगळ्या सेन्सरचा वापर करण्यात आलेला आहे. हे सेन्सर हेल्मेट वापरणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देण्यासह वातावरण तसेच परिसरातील घटनांचीही नोंद ठेवणार आहे. विविध ठिकाणी जीव धोक्यात घालून काम करणारे कर्मचारी, अंतराळवीर, केमिकल फॅक्टरी, पॉवर प्लॅन्ट, खाणकाम करणारे कर्मचारी, वॉटर डायवर व बायकर्स यांना या हेल्मेटचा उपयोग होणार आहे. या हेल्मेटच्या कल्पनेबद्दल पेटंट मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्मार्ट हेल्मेटचा वापर दुचाकी वापरणारे विद्यार्थी व त्यांची चिंता करणाऱ्या पालकांनाही होणार आहे. के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्युशनल संस्थेचे विश्वस्त कल्याण जाधव यांनीही या संशोधनाला विशेष सहकार्य दिले आहे.
संशोधनात संस्थेचे संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, खजिनदार विनोद जाधव, ट्रिनिटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभिजीत औटी यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले आहे.