अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचा दौरा संपवून यूएईला पोहोचले आहेत. पंतप्रधान अबुधाबी विमानतळावर त्यांचे युवराज एचएच शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी स्वागत केले. त्याचवेळी मोदींच्या स्वागतासाठी जगातील सर्वात मोठी इमारती बुर्ज खलिफावर भारतीय तिरंग्यासह मोदींचे चित्र दाखवण्यात आले. “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत” असे बुर्ज खलिफावर लिहिण्यात आले होते.
आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी महत्त्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर बैठका घेणार आहेत. वेळापत्रकानुसार दुपारी २.१० वाजता पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत होईल. यानंतर शिष्टमंडळाची चर्चा होईल. त्यानंतर दुपारी 3.20 वाजता जेवण होईल. यानंतर ते दुपारी ४.४५ वाजता दिल्लीला रवाना होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा ५वा यूएई दौरा आहे. ऑगस्ट 2015 मध्ये, त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचा पहिला दौरा केला. 34 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच UAE भेट होती.
भारत आणि UAE दरम्यान ऊर्जा, अन्न सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रांवर चर्चा होऊ शकते. भारत सोडण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते- मी माझे मित्र, महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक यांना भेटण्यास उत्सुक आहे. आमचे दोन्ही देश व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अन्न सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, फिनटेक, संरक्षण, सुरक्षा आणि मजबूत लोक ते लोक संबंध यासारख्या विस्तृत क्षेत्रात गुंतलेले आहेत.