दुबई – नेदरलॅंडपाठोपाठ आता युरोपातील आणखी एका फुटबॉलवेड्या स्पेनमध्ये पुढील महिन्यात एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. स्कॉटलंड, नामिबिया व नेपाळ या तीन संघात ही मालिका 20 जुलैपासून सुरू होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी युरोपमधील नेदरलॅंडमधेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले आहे. स्कॉटलंड, नामिबिया आणि नेपाळ या देशांच्या तिरंगी मालिकेचे यजमानपद आयसीसीने स्पेनला दिले असून याद्वारे क्रिकेटची लोकप्रियता आणखी अनेक देशांत व्हावी असा आयसीसीचा उद्देश आहे.
आयसीसीकडून अनेक स्पर्धांसाठी असे देश निवडले जात आहेत जिथे हा धोका फारसा नाही तिथे क्रिकेटसाठी मैदाने तयार करणे तसेच आहेत त्या मैदानांवर क्रिकेटचीही सुविधा तयार करणे सहज शक्य आहे. मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा स्कॉटलंडमध्ये होणार होती. मात्र, तिथे करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने स्पेनमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेत आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने खेळवले जाणार आहे. 20 ते 30 जुलैदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर युरोपीय महिला टी-20 विश्वकरंडक पात्रता सामनेही होणार आहेत.
19 वर्षांखालील विश्वकरंडक पात्रता सामन्यांचेही आयोजन केले जाणार असून त्यासाठी स्पेनसह आणखी काही देश यजमानपद भूषवण्यास उत्सुक आहेत. ही स्पर्धा 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.