पुणे – धर्मादाय रुग्णालयांनी गरीब आणि निर्धन रुग्णांना नियमानुसार उपचार द्यावेत, अशा सूचना धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. सार्वजनिक धर्मादाय न्यासांतर्गत नोंद असलेल्या आणि वार्षिक पाच लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च असलेल्या रुग्णालयांसाठी या सूचना आहेत.
धर्मादाय रुग्णालयांनी एकूण खाटांच्या 10 टक्के वाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत उपचारासाठी आणि 10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी सवलतीच्या दराने उपचारासाठी आरक्षित ठेवाव्या. तातडीच्या वेळी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णाला ताबडतोब दाखल करून घ्यावे. रुग्ण स्थिर होईपर्यंत, त्याला प्राण वाचवण्यासाठीचे सर्व तातडीचे उपचार आणि प्रक्रिया यासाठीच्या अत्यावश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
आवश्यकता वाटल्यास पुढील उपचारासाठी रुग्णास सार्वजनिक रुग्णालयात नेण्यासाठी वाहतुकीची सुविधा पुरवावी. तातडीचे रुग्ण म्हणून दाखल करून घेताना धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णाकडून कोणतीही अनामत रक्कम मागू नये, असे सूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
“निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांनी जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या यादीनुसार धर्मादाय रुग्णालयात उपचार घ्यावेत आणि रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णाचे उपचार नाकारल्यास संबंधितानी अधीक्षक रुग्णालय आणि निरीक्षक रुग्णालय धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, पुणे यांच्याशी संपर्क साधावा.” – सुधीरकुमार बुक्के, धर्मादाय सहआयुक्त