पिंपरी, (प्रतिनिधी) – वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे आणि वाणिज्य वापराचे ठिकाणी तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना त्याबाबातचे लेखी निवेदन त्यांनी दिले. त्यामध्ये सावळे यांनी म्हटले की, मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. अशा स्थितीत आगीच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असते. मागील काही वर्षात आगीच्या अनेक गंभीर घटना पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात व देशभरात घडल्या आहेत.
या आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. मागील काही महिन्यांत तळवडे, शाहूनगर, चिखली आदी ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ हे ६ डिसेंबर २००८ नुसार दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात अग्नी प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत असल्याचा दाखला (फायर ऑडिट) मिळविणे बंधनकारक केले आहे. तसेच, आगामी दोन महिन्यांमध्ये तीव्र उन्हाळा जाणवणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांमध्ये आणि वाणिज्य वापराच्या ठिकाणी आगीच्या घटनांचा मुकाबला करण्यासाठी लावलेले फायर एक्सटिंगग्वीशर रिकामे अथवा अपुरे आहेत का ? आग लागल्यास काळजी घेणारे सेफ्टी फलक,
अग्निचे माहिती देणारे ऑटोमेटेड फायर अलॉर्म सिस्टम इत्यादी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित आहे का ? याबाबतचे फायर ऑडिट तातडीने करावे. अग्निशमन दलाच्या वतीने काही प्रमुख ठिकाणी माॅकडि्रल घेण्यात यावे, अशीही मागणी सावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.