“ऑक्टोबर क्रांती’चा 60वा वर्धापन दिन
मॉस्को, दि. 7 – रशियातील “ऑक्टोबर क्रांती’च्या 60व्या वर्धापन दिन समारोहास येथील ऐतिहासिक लाल चौकात भव्य संचलनाने आज सुरुवात झाली. त्यावेळी काही लाख लोक तेथे जमले होते. सर्वांनी लाल झेंडे फडकावले. संचलनाची पाहणी राष्ट्राध्यक्ष ब्रेझनेव्ह व पंतप्रधान कोसिजिन यांनी केली.
सूर्यमालेतील आणखी एका ग्रहाचा शोध
पूसाडेना (कॅलिफोर्निया) – सूर्यमालिकेतील सर्वात छोटा व 10वा ग्रह शोधून काढण्यात आला आहे. मि. चार्लस कोवल यांनी हा शोध लावला आहे. आतापर्यंत 9 ग्रहांचा शोध लावण्यात आला आहे.
विद्यार्थी व व्यावसायिक संघटनांना निवडणुकीस बंदी
नवी दिल्ली – विद्यार्थी संघटनांच्या व व्यावसायिक संघटनांच्या निवडणुकीस पाकिस्तान लष्करी राजवटीने बंदी घातली आहे. या बंदी हुकुमाचा भंग करणारा तीन वर्षे शिक्षेस पात्र ठरेल, असेही जाहीर करण्यात आले आहे. कोणासही स्थानबद्ध करण्याचा अधिकार यापूर्वी फक्त लष्करी सत्ता प्रमुखास होता. तो अधिकार आता लष्करी प्रशासनास देण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेत वांशिक युद्ध होणार नाही
वॉशिंग्टन – या क्षणी किंवा भविष्य काळात दक्षिण आफ्रिकेत वंश-विद्वेषी युद्ध सुरू होणार नाही असे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान जॉन फॉर्स्टर यांनी जाहीर केले आहे.