ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांवर संक्रांत
नाणे मावळ – मावळ तालुक्यात करोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने यावर्षीही यात्रांवर निर्बंध घातले आहेत. याशिवाय निर्बंधामुळे यावर्षी नागरिकांच्या आनंदावर पाणी पडले आहे.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आजही करोनाची दहशत कायम आहे. गेल्या वर्षी बहुतेक यात्रा करोना महामारीमुळे रद्द झाल्या. गेले काही दिवस करोना रुग्ण संख्या कमी झाल्याने गावदैवताचा उत्सव साजरा करता येईल, अशी आशा पल्लवीत झाली होती; परंतु गेल्या 15 दिवसांत करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने यात्रा, जत्रा, उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील पवन मावळ, नाणे मावळ, आंदर मावळ, कामशेत, कार्ला, तळेगाव दाभाडे, वडगाव, इंदोरी, सोमाटणे या गावांच्या यात्रांमध्ये मोठी उलाढाल असते. धार्मिक कार्यक्रमात तमाशा, कुस्त्यांचा फड, मैदान, नाटक, ऑर्केस्ट्रा अशा मनोरंजनाच्या कार्मक्रमांची मेजवानी असते.
याशिवाय पुणे, मुंबई शहरात कामानिमित्त राहणारे, माहेरवाशीण, नातेवाईक, मित्र परिवार येत असतात. संसर्गजन्य असलेल्या करोनामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकारने यात्रा, उत्सवांवर मर्यादा आणली आहे. शेकडो वर्षे चालू असलेल्या यात्रांवर मर्यादा आल्या आहेत.
यंदा साध्या पद्धतीने यात्रा करण्यात येत आहेत. या यात्रात देवाच्या प्रसादाला मागणी असते, मिठाईच्या दुकानात लाखो रुपयांची उलाढाल होते. तसेच खेळणी, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू, पाळणे मोठ्या प्रमाणात येतात. मात्र अशी विविध प्रकारची दुकाने लावण्यासही बंदी करण्यात आली असल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मात्र, सरकारी आदेशाप्रमाणे करोना रुग्ण सध्या पुन्हा आढळत आहेत.