कार्ला, (वर्ताहर) – देवले गावचे ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त सहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेची सांगता जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने झाली.
२१ फेब्रुवारीला वर्धापन दिनानिमित्त अभिषेक व होम हवन करुन यात्रेच्या कार्यक्रमास सुरवात झाली. सहा दिवसांत हभप दर्शन महाराज कबाडी, हभप घनश्याम महाराज पडवळ यांची कीर्तनरुपी सेवा झाली. तसेच परिसरातील गावातील मृदुंगाचार्य, गायनाचार्य, भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.
मनोरंजनासाठी हभप सावता महाराज केशव फुले यांचे एकपात्री भजन भारुड झाले. तसेच शनिवारी श्री काळ भैरवनाथ देवाच्या पालखीची मिरवणूक व संध्याकाळी मनोरंजनासाठी अजंलीराजे नाशिककर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला. सोमवारी (दि. २६) देवले ग्रामस्थांच्या वतिने जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांनी या आखाड्यात कुस्त्या करत ग्रामस्थांची वाहवा मिळवली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवले ग्रामस्थ सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते मान्यवर व उत्सव कमिठीचे सर्व पदाधिकारी पंच याचे योगदान मिळाले.