मांढरदेव – कर्नाटकसह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या काळूबाई देवीच्या दर्शना साठी यात्रेच्या सातव्या दिवशी मांढरगडवर जवळ जवळ तीन लाख भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यामुळे मांढरगडावर भक्तांची मांदियाळी सर्वांनी अनुभवली.
मांढरगडावर यात्रेच्या पहिल्या दिवसांपासून भक्तांच्या गर्दीचा ओघ सुरुच असून आजपर्यंत लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवारी यात्रेचा सातवा दिवस असूनही भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यामुळे भक्तांची मांदियाळीच दिसून आली. यात्रा कालावधीत प्रशासनाकडून सर्व मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या गेल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेताना कोणतीही समस्या निर्माण झाली नाही त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
संपूर्ण यात्रा कालावधीत मांढरगडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व भाविकांना देवीचे दर्शन विनाविघ्न व्हावे यासाठी वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम व वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरणे, सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
त्यामुळे कोणताच अनुचित प्रकार न घडता भाविकांना दर्शन घेणे सोयीचे झाले होते. याबरोबरच आरोग्य विभागाचे काम देखील चांगल्या पध्दतीने सुरु असल्याने भाविकांची काळजी घेण्यात आली होती. आपतकालीन परिस्थितीत आवश्यक औषधांचा साठा तसेच रुग्णवाहिकाही सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
देवस्थानचे चेअरमन व विश्वस्त यात्रा कालावधीत सातत्याने मंदिर परिसर व मंदिरातील स्वछता ठेवण्याबरोबरच व भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.