भाडेदर वाढविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव
पुणे – शहरातील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ई-बसेसचा तिकीट दर येत्या काळात वाढण्याची शक्यता आहेत. सामान्य बसपेक्षा पाच रुपये अधिक भाडेदर वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. याबाबत गुरुवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.
पुण्यात फेब्रुवारी 19 मध्ये ई-बसेस धावण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने पीएमपीच्या ताफ्यात बसेस देखील दाखल होत आहेत. ई-बसेसला साध्या बसेसच्या दरातच ई-बसेसमधून प्रवासाला परवानगी देण्यात येण्यात येत होती.
मात्र, आता येत्या काळात ई-बसचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने प्रस्ताव देखील तयार केला असून गुरुवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. याशिवाय रातराणी आणि विमानतळावर ये-जा करणाऱ्या बससेवेच्या तिकीट दराबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.
यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रवाशांना 40 रुपयांना एका दिवसाचा पासचा देखील प्रस्ताव असून याबाबत देखील निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी संचालक मंडळाकडून मान्यता मिळाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी देखील प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, संचालक मंडळाकडून त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नव्हती. मात्र, पुन्हा एकदा प्रशासनाने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून मंडळाच्या मान्यतेनंतर तिकीट दरात वाढ होणार आहे. करोनामुळे पीएमपीची प्रवासी सेवा बंद असल्याने पीएमपीची चाके आर्थिक संकटाकडे वळत आहेत.