कॅनबेरा – ऑस्ट्रेलियात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली प्रवास बंदी लवकरच उठविण्यात येणार आहे. तसेच 18 महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियाच्या सीमा जगासाठी पुन्हा एकदा खुल्या केल्या जाणार आहे.
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्याच्या आणि निर्बंध कमी करण्याच्या हेतूने नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय सीमा पुन्हा उघडण्यात येणार आहे, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जाहीर केले आहे.
स्कॉट मॉरिसन म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने परदेशी नागरिकांसाठी ऑस्ट्रेलियाच्या सीमा बंद केल्या होत्या. आता ज्या राज्यात लसीकरणाचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहचले आहे, तिथल्या आंतरराष्ट्रीय सीमा उघडल्या जातील. याची सुरुवात ही ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यापासून होणार आहे.
ते म्हणाले की, न्यूझीलंडसारख्या देशात करोनाचा अजिबात प्रादुर्भाव नाही, अशा देशातून येणाऱ्या प्रवाशांना ऑस्ट्रेलियात विना क्वारंटाईन एन्ट्री दिली जावी याबाबतही विचार सुरु आहे. हा निर्णय सर्वांच्या संमतीनंतर घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियात लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांव्यतिरिक्त इतर परदेशी नागरिकांना 1 आठवड्याच्या होम क्वारंटाईनला परवानगी देण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियन नागरिकांनी करोना लसीचे 2 डोस घेतले असल्यास त्यांना कमर्शिअल फ्लाईटमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाईन फ्री प्रवासाबद्दलही विचार सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च 2020पासून कडक निर्बंध लागू केले होते. ज्यात लोकांना परवानगीशिवाय परदेश यात्रा करता येत नव्हती.