Stock Market : शेअर बाजारात नफेखोरी चालूच

जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश

मुंबई – शेअर बाजाराचा निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असताना जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार निर्देशांकांत घट नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 360 अंकांनी कमी होऊन 58,765 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 86 अंकांनी कमी होऊन 17,532 अंकांवर बंद झाला.

एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, टीसीएस कंपन्यांबरोबरच बजाज फिन्सर्व, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स या बड्या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. आजच्या विक्रीच्या वातावरणातही महिंद्रा, डॉक्‍टर रेड्डी, अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रिड या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली असल्याचे दिसून आले.

निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार नफा काढून घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे रिलायन्स सिक्‍युरिटीजचे विनोद मोदी यांनी सांगितले. वित्तीय कंपन्या, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. मात्र धातू आणि औषधी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची काही प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले.

त्यांनी सांगितले की, निर्देशांकाचे जास्त नुकसान झाले असते, मात्र बऱ्याच वाहन कंपन्यांनी समाधानकारक विक्री झाल्याची आकडेवारी जाहीर केल्यानंतर काही प्रमाणात खरेदी झाली. पुढील आठवड्यापासून कंपन्यांचे तिमाही ताळेबंद जाहीर होणे सुरू होणार आहे. त्या आधारावर गुंतवणूकदार आगामी काळात निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. आशियाई शेअर बाजार सटीमुळे बंद होते तर युरोपीयन शेअर बाजारातून नकारात्मक संदेश आल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.