नंदुरबार – नवापूर तालुक्यातील सोनखांब शिवारात धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर गुजरातमधून महाराष्ट्रात वाहून नेण्यात येणारा 19 लाख रुपयांचा अवैध गुटखा विसरवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने जप्त केला आहे.
वाहनासह एकूण 32 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतला. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक नवापूरहुन धुळेच्या दिशेने जात होता. यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीस्तव वाहतूक करताना मिळून आला.
संबंधित वाहनास सोनखांब गावाच्या शिवारात शेरे पंजाब हॉटेलनजीक अडवले असता पोलिसांनी त्याची विचारपूस केल्यावर उडवा उडीचे उत्तरे दिले. पोलिसांना संशयास्पद वाटल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात केसरयुक्त विमल पानमसाला व
व्ही वन तंबाखू असे एकत्रित साठा 17 हजार सहाशे पाकिटे त्यांची एकूण किंमत 19 लाख पाच हजार दोनशे रुपये तर वाहनाची किंमत 13 लाख रुपये असे एकूण 32 लाख पाच हजार दोनशे रुपये मुद्देमाल हस्तगत केला.
अन्न व औषध प्रशासन विभाग नंदुरबारचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक भटू चौधरी याच्या विरुद्ध विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.