महाविकास आघाडी कार्यकर्ता बैठकीचे दीपक मानकर यांच्याकडून आयोजन
पुणे – ‘पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आदर्श उमेदवार असून त्यांच्या घराण्याची देशसेवेची परंपरा आहे. प्रश्न तडीस लावण्याची वृत्ती असलेले लाड विचारांशी तडजोड न करता प्रश्न सोडवतात. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात परिवर्तन होईल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले?’ असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
पुणे महाविकास आघाडीचे पदवीधरचे अधिकृत उमेदवार अरूण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आजगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी कार्यकर्ता बैठक माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी आयोजित केली होती.
याप्रसंगी पाटील बोलत होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार, शिक्षक संघटनेचे मारणे, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी दीवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी स्वागत केले.
पाटील म्हणाले, “तिजोरी मोकळी झाल्यानंतरही कायम अनुदानित शिक्षकांच्या पुढील अनुदानाचा निर्णय सरकारने घेतला. तर, करोनाच्या काळात पावलोपावली भाजपने राजकारणाची संधी साधली. एक बेजाबदार विरोधी पक्ष कसा असू शकतो? याचे उदाहरण भाजपने दिले. पदवीधरचे अधिकृत उमेदवार अरुण लाड हे प्रामाणिक, स्पष्ट वक्ता आणि विचारावर श्रद्धा असणारे क्रांतिकारी घराण्यांची परंपरा असलेले उमेदवार आहेत. ते पदवीधरांच्या प्रश्नांसाठी उभे राहतील.’
माजी उपमहापौर, नगरसेवक मानकर म्हणाले, “आम्ही पुणेकरांनी एकदा एखाद्या विडा उचलला की, त्याला मार्गी लावल्याशिवाय थांबणार नाही, आणि पुणे पदवीधर मतदार संघात परिवर्तन निश्चित असून पुणेकर मतदार लाड आणि प्रा. आजगावकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत.’