नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. पुण्यातील सिरम इन्सिट्यूटकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लसीचे १० कोटी डोस तयार असतील असे सांगितले आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९८ देशांचे राजदूत २७ नोव्हेंबर रोजी भेट देण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाची बैठक झाली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सिरम इन्सिट्यूटचे अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविशिल्ड करोना लसीचे १० कोटी डोस तयार असतील अशी माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. काही ठराविक परिस्थितींमध्ये कोविशिल्ड लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्याच्या घडीला करोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी यावेळी करोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा केला आहे. “मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र सरकार प्रत्येक डोससाठी २५० रुपये खर्च करत ९० टक्के पुरवठा खरेदी करणार आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.
अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने करोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. “भारतात लस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील. जानेवारीपर्यंत आपल्याकडे किमान १० कोटी डोस तयार असतील. सरकारने जुलैपर्यंत ३० कोटींचे टार्गेट ठेवले आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये असणार आहे. तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. अदर पूनावाला यांनी यावेळी सर्वसामान्यांना लस उपलब्ध होण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल असेही सांगितले आहे. मार्चच्या आधी मार्केटमध्ये १० टक्के डोस उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत लस वितरण सरकारच्या अखत्यारित राहील असे त्यांनी सांगितले. “सर्वसामान्यांना सहजपणे लस उपलब्ध होणार आहे. जर पात्र असतील तर त्यांनी सरकारी केंद्रावर जाऊन घ्यावी लागेल, अन्यथा त्यांना मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे,” असे ते म्हणाले आहेत.