मूकबधिर म्हणून आला अन् दागिन्यांवर डल्ला मारला

सहा लाखांचा ऐवज हातोहात लंपास

पुणे – मूकबधिर असल्याचा आव आणत भामट्याने हॉलमार्किंग सेंटरमध्ये सहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना फडके हाऊस येथील श्री सिद्धनाथ हॉलमार्किंग सेंटर येथे घडली.

रोमित सांडभोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या भामट्याविरुद्ध फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या दिवशी त्यांचा एक नियमित ग्राहक हॉलमार्किंगसाठी दागिने घेऊन आला. यावेळी काऊंटरवर रोमित व त्याचा सहकारी होता. दरम्यान, हा ग्राहक गेल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत एक मूकबधिर व्यक्ती तेथे आला. त्याने लाल टोपी व मास्क वापरला होता. त्याने केरळ पूरग्रस्तांना मदतीचे कार्ड दाखवत पैशांची मागणी केली.

 

त्याने ते कार्ड काऊंटवरील दागिन्यांच्या पिशवीवर ठेवले. यानंतर डायरी दाखवत, त्यावर इतरांनी दिलेल्या मदतीच्या नोंदी दाखवल्या. यामुळे रोमित यांनी 20 रुपये दिले. मात्र, तरीही तो तेथून न जात नव्हता. हातवारे करत आणखी पैसे मागू लागला. अखेर रोमित यांनी त्याला हाकलून दिले. जाताना त्याने लॅमिनेट केलेले कार्ड उचलताना दागिन्यांची पिशवीही उचलली.

 

दरम्यान, पाचच मिनिटांत रोमित यांचा सहकारी जेवायला उठला, तेव्हा त्याला काऊंटरवरील दागिन्यांची पिशवी आढळली नाही. दरम्यान, सीसीटीव्ही तपासले असता संबंधित मूकबधिर व्यक्तीने पिशवीवर लॅमिनेशन कार्ड ठेवलेले दिसले. तसेच तो कार्डसोबत पिशवीही नेताना दिसला. पोलिसांना संबंधित व्यक्ती स्वारगेटपर्यंत चालत जाताना दिसला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.